बुलडाणा (आरएनआई) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व विभागांनी या निवडणुकीत प्राधान्यक्रम आणि तातडीने करावयाची कार्यवाही करावी. तसेच संपूर्ण निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले।
जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व विभागप्रमुख आणि जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, अजिंक्य गाडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. मोहन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक थोरात आदी उपस्थित होते।
जिल्हाधिकारी म्हणाले, बुलडाणा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून मतमोजणी विविध टप्प्यावर अनुषंगीक कार्यवाही करण्यात यावी. आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींचे छायाचित्र किंवा नाव हटविण्याची प्रक्रिया तातडीने करण्यात यावी. तसेच कार्यालयांनी त्यांच्याकडील सुरू असलेली कामे आणि पूर्ण झालेली कामे यांची माहिती तातडीने सादर करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने वाहनांची व्यवस्था करण्यात यावी. निवडणूक कालावधीत शासकीय वाहनांचा दुरूपपयोग होऊ नये, याची काळजी घ्यावी।
निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया, मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येतील. या प्रशिक्षणादरम्यान निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मतदानाची सोय करण्यात आली आहे. यावेळी सेवेत असणाऱ्या संपूर्ण कर्मचाऱ्यांचे मतदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ईव्हीएम आणि व्हीहीपॅट मशिनची पुरेशी उपलब्धता आहे. या मशिनची तपासणी केल्यानंतरच विधानसभानिहाय वाटप करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर पुरेशा सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात. मतदारसंघात १ हजार ९६२ मतदान केंद्र राहणार असून यातील ५६ मॉडेल मतदान केंद्र राहणार आहे. या केंद्रावर महिला, युवक आणि दिव्यांग कर्मचारी कार्यरत राहणार आहे. तसेच निवडक मतदान केंद्राचे वेबकास्टींग होणार आहे।
मतदानाचा टक्का वाढावा आणि नागरिकांचा निवडणुकीत सक्रीय सहभाग नोंदवावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रामुख्याने कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राच्या भागात जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच ८५ वर्षे वय आणि दिव्यांग मतदार मतदान केंद्रावर येण्यास सक्षम नसल्यास त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मतदान केंद्रास्तरीय अधिकारी यांच्याकडे रितसर मागणी नोंदवावी लागणार आहे. नियमानुसार चित्रिकरण करून संबंधित व्यक्तीचे मतदान करून घेण्यात येणार आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. नागरिकांनी तक्रारीसाठी सी व्हीजील, व्होटर हेल्पलाईन, क्नो युवर कँडिडेट यासारखी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले।
Follow the RNI News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBPp7rK5cD6XB2Xp81Z